प्रति,
संपादक,
स्पार्कः व्हॉईस ऑफ यूथ
आजच स्पार्कचा नवीन अंक वाचला. टिस(TISS)मधील विद्यार्थ्यांचा संघर्ष, मुंबई युनिर्व्हसिटी मधील घोळ, AICTEने बदललेल्या गुणोत्तरामुळे प्राध्यापकांच्या नोकऱ्यांवर घाला. अशा अनेक बाबींचा समावेश त्यांत आहे. त्यामुळे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ह्या मॅगझीनच्या माध्यमांतून आपलीही समस्या मांडावीशी वाटतेय.
बहुसंख्य स्पार्कचे वाचक हे विद्यार्थी असतील. नेहमीच विद्यार्थी आणि शिक्षकांना परस्पर विरोधी टोकांवर उभे केले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या समस्या माहीत नसतात. तर दुसरीकडे शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या समस्यांमध्ये इतके गुंतवून ठेवले जातेय की त्यांना विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन शिकवणे मुश्कील होऊन बसलेय. एक वेगळेच दुष्टचक्र यातून निर्माण झाले आहे. त्यामुळे एकमेकांच्या समस्या समजून घेऊन त्यांतून सुवर्णमध्य शोधणे हाच एक उपाय आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका विना-अनुदानित(un-aided)महाविद्यालयात मी प्राध्यापकाची नोकरी करतो. अशा महाविद्यालयाचा संपूर्ण खर्च विद्यार्थ्यांच्या फी आकारणीतून केला जातो. आज जगभरात सुरु असलेली मंदी व देशातील बेरोजगारीमुळे जास्तीत जास्त विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे पाठ फिरवीत आहेत. त्यामुळे संचालक मंडळींकडून प्राध्यापकांवर जास्तीत जास्त विद्यार्थी गोळा करण्याची जबाबदारी टाकण्यात येतेय. आसपासच्या शाळा आणि कनिष्ट विद्यालयांत प्रचार करण्याची जबाबदारी प्राध्यापकांना देण्यात आली होती. अनेक प्राध्यापकांना त्यांच्या हक्काच्या सुट्टीतही प्रचारासाठी भटकावे लागले.
मुंबई विद्यापीठाने पहिल्या वर्षासाठी अॅडमीशन फॉर्म तर ऑनलाईन ठेवला परंतू पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये कोणत्या कॉलेज मध्ये नाव आले हे मात्र कॉलेजमध्येच जाऊन विद्यार्थ्याना पाहावे लागणार होते. अशामुळे जे विद्यार्थी मेरिट लिस्ट पाहण्यासाठी आले नाहीत त्यांना फोन करून बोलविण्याची जबाबदारीदेखील प्राध्यापकांवर टाकण्यात आली. कागदपत्रांची तपासणी, वैयक्तिक मार्गदर्शन अशी अनेक कामे प्राध्यापकांवर थोपण्यात येतात. अनेकदा आपण नक्की येथे शिकवण्यासाठी आलोय की कारकुनी अथवा मार्केटिंग करण्यासाठी आलोय असाच प्रश्न आम्हां प्राध्यापकांना पडतोय.
आता तुम्ही असे म्हणाल की जर ही सगळी कामे तुमच्या पदाला साजेशी नाहीत तर तुम्ही ती कामे करायला नकार का बरं देत नाहीत. ह्या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे की आज खूप सारे पदवीधर बेरोजगार आहेत. जेव्हा एका प्राध्यापकाच्या जागेसाठी मुलाखती होतात तेव्हा शेकडांनी अर्जदार त्या जागेसाठी निवेदन करतात. आमची नोकरी जर गेली तर त्या जागेसाठी दुसरा उमेदवार संचालकांना लगेच प्राप्त होतो. नेट-सेट पदवी प्राप्त अनेकजण तुटपुंज्या पगारावर “फिक्स टर्म” कंत्राटी पद्धतीत काम करीत आहे. त्यामुळे अशी कामे करवून घेणे संचालकांना शक्य होतेय.
प्राध्यापकांची मुख्य जबाबदारी शिकवण्याची असते परंतु आज त्यांना अन्य कामांतच गुंतवून ठेवले जात आहे, विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कल वाढावा, विषयाची त्यांत गोडी निर्माण व्हावी म्हणून शिकवण्याच्या पद्धतीत कल्पक बदल प्राध्यापकांना वेळोवेळी करावे लागतात. आज त्यांना अन्य कामांतून फुरसतच मिळत नसल्याने त्यांना रटाळवाण्या एकाच पद्धतीने शिकवण्यासाठी मजबूर व्हावे लागत आहे. त्यांना नवनवी तंत्रे अंमलात आणण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही.
आज गरज आहे ती शिक्षक विद्यार्थी आणि पालकांच्या एकजुटीची. तसे करण्यासाठी आधी एक दुसऱ्यांच्या समस्या आपल्याला समजून घ्यायला हव्यात. एकजुटीने संघर्ष केल्यानेच शिक्षणाचा दर्जा सुधारला जाऊ शकतो. स्पार्कः व्हॉईस ऑफ यूथचा हा प्लॅटफॉर्म आपल्याला खूप उपयोगी ठरू शकतो. चला शिक्षक-विद्यार्थी आणि पालक एकजुटीच्या कामाला लागूयात!
-प्राध्यापक प्रविण कुमार