सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील एम.फिल. आणि पी.एच.डी. विद्यार्थी संशोधकांनी विद्यावेतन खंडित करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन पुकारले. एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ ५००० रु. तर पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ८००० रु. दरमहा असे विद्यावेतन विद्यापीठ मिळालेल्या अनुदानातून देत आले आहे. विद्यापीठ अनुदान बंद झाले असल्याने काही महिने विद्यापीठाने स्वतःच्या निधीतून विद्यावेतन देऊ केले. नंतर ते देखील थांबविण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. मात्र २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संशोधकांच्या विद्यावेतानाबाबत विद्यापीठाने काही नियम आखले. जे.आर.डी. टाटा. गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गुणवत्तेच्या आधारावर केवळ १०० विद्यार्थी संशोधकांनाच विद्यावेतन देण्यात येईल.
कुठल्या गुणवत्तेचा आधार घेतला जाणार आणि ज्यांना विद्यावेतन मिळेल त्यांच्या गुणवत्तेत आणि इतरांच्या गुणवत्तेत असा कुठला फरक विद्यापीठ दाखवून देणार आहे? जर विद्यावेतन देण्यासाठी विद्यापीठाकडे निधी नव्हता तर प्रवेशप्रक्रियेत गुणवत्तेचा निकष का नव्हता? अशा अनेकविध प्रश्नांच्या स्वरुपात आपल्या मागण्या आखत सलग १८ दिवस विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन पुकारले. ह्या आंदोलनाच्या १३ व्या दिवसापर्यंत विद्यापीठ कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे चित्र पाहून ५ आंदोलनकर्त्यांनी ५ दिवसांचे उपोषण करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर, विद्यापीठाच्या काही विभागांना ताळे ठोकण्याचे धाडसही ह्या विद्यार्थ्यांनी दाखविले. याच दरम्यान उपोषणामुळे काही आंदोलनकर्त्यांवर उपचार करण्याची वेळ आली. तरीसुद्धा न डगमगता एकजुटीने आंदोलन सक्रीय ठेवत आणि आपल्या मागण्यांवर ठाम राहत या आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि यात त्यांना अखेरीस यश मिळाले.
विद्यापीठ प्रशासनाकडून लेखी स्वरुपात दिलेल्या निर्णयानुसार २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्वी ४ वर्षांसाठी दिले जाणारे विद्यावेतन येथून पुढे ३ वर्षांसाठी दिले जाईल. या निर्णयाशी तडजोड करत विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
एकजुटीने उभारलेल्या या लढ्यातून मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थी संशोधकांचे अभिनंदन!