
आज आपला देश नक्की कोणत्या मार्गावर वाटचाल करीत आहे तेच कळत नाहीये. मागील 10 दिवसांपासून घडणाऱ्या गोष्टींमुळे कित्येकांचा संपूर्ण न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडाला आहे.
झाले असे की, 20 एप्रिल रोजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैगिंक अत्याचाराचे आरोप करण्यात आले. पीडीत महिलेने न्यायाधीशांवर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक प्रलंबित केसेस असणाऱ्या न्यायालयाने ह्या केसचा निकाल लावण्यासाठी तीन न्यायाधीशांचा विशेष बाक बसवला. आणि इतकेच नव्हे तर खुद्द ज्यांवर आरोप केले गेले ते गोगोईच फैसला करण्यासाठी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
मित्र मैत्रिणींनो आता तुम्हीच विचार करा! जर आपण चोरालाच शिपाई नेमले तर काय होईल? ज्यांवर आरोप आहे तेच जर निर्णय देऊ लागले तर काय न्याय पीडितेला मिळेल? आणि झालेही अगदी तसेच! ’’करण्यात आलेले आरोप म्हणजे मला माझ्या पदांवरून हटविण्यासाठीचे मोठे कारस्थानच आहे’’ असे गोगोईंनी भावनात्मकपणे मांडून ही जनहित याचिका फेटाळून लावली. इतक्यावरच न थांबता या आरोपांबाबत मिडियावर होणाऱ्या कोणत्याही चर्चांवर बंदी घालण्याचे आदेश देखील देण्यात आले.
या सर्व घडामोडींचा धिक्कार करण्यासाठी देशाच्या विविध भागांत प्रदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांपैकी जवळपास 50 जणींना अटक देखील करण्यात आली. हे सर्व चित्र पाहता आपला देश नक्की कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे यावर प्रश्न उपस्थित राहतात. आपल्या देशातील अनेक नागरिकांचा सुप्रीम कोर्टावरचा विश्वासाला दिवसेंदिवस तडे जाऊ लागलेत. आम नागरिकांना कोर्टात न्याय मिळणे दिवसेंदिवस अशक्य बनत चाललेय.
जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवीत आहेत आज त्यांच्यावरच लाठी उगारली जात आहे. लोकशाहीच्या कोट घालून हूकूमशाहीच एक प्रकारे राबविण्यात येते. आज आपल्या सर्वांना एकत्र येऊन आवाज उठवणे खूप गरजेचे आहे. आपल्या सगळ्यांची मजबूत एकता आपल्यावरील अन्यायांना थांबवू शकते.
मित्र-मैत्रिणींनो चला एकत्र येवून सर्व अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
गोगोईवर निष्पक्षपणे चौकशी करुन निकाल लावलाच पाहिजे.
आपल्या मैत्रिणींना आणि महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक थांबलीच पाहिजे.
महिलांच्या सशक्तीकरणासाठी एकत्र येवूया!