जगातील उत्कृष्ठ समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत गोष्टी मिळविण्यासाठी आंदोलनं करावी लागत आहेत. चांगले शिक्षण, चांगले अन्न, आणि इतर गरजेच्या सोयी ज्या त्यांच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या अगदी सहजपणे मिळायला हव्यात, मात्र असे काहीही होताना दिसत नाहीये. त्यांच्या रोजच्या जेवणावरदेखील नानाविध नियमांची बंधनं घातली जात आहेत. जसे की, विद्यापीठातील भोजनालयात रु. ४० किंमतीच्या थाळीत एकाच व्यक्तीस जेवण्याची मुभा, मासिक रक्कमेचा महिना सुरू होण्याआधीच भरणा, इ. विद्यापीठात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी हे जेमतेम परिस्थितीतून आलेले असताना थाळीचा दर त्यांना परवडत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी एकत्र एकाच थाळीत जेवतात. थाळीच्या दराबाबत व एकाच थाळीत अनेकांना जेवायला लागत असल्याने त्यांची पोटं भरतात तरी कशी याबाबत विचार करायचा सोडून, विद्यार्थ्यांना अजूनच अडचणीत ओढले जात आहे. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा विचार न करता भोजनालायाच्या नियमांच्या अंमलबजावणीला अनन्यसाधारण महत्व दिले जात आहे.
याचाच निषेध म्हणून या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन उभे केले. ह्या आंदोलनात, MPYC चे सतीश गोरे, NSUI चे सतीश पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे सोमनाथ लोहार, पत्रकार आकाश भोसले, मुक्तीवादी संघटनेचे आकाश दौंडे, कृणाल सपकाळ, मुन्ना आरडे आणि अनेक इतर विद्यापीठाचे विद्यार्थी सामील होते. तर या आंदोलनाच्या प्रतिसादारूपात विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न बाजूला सारून यात सहभागी विद्यार्थ्यांना कलम ३५३ नुसार अटक करण्यात आली. या कलमाचा सर्रास गैरवापर करून विद्यार्थ्यांची मतं चिरडून टाकण्यात आली असून त्यांना सरळ गुन्हेगार जाहीर करण्यात आले आहे! युवा क्रांती दल, जागृत पुणेकर समिती, आणि मनसे या संघटनेने ह्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या लढ्यास पाठिंबा दिला.
विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांप्रती घेतलेला हा निर्णय धक्कादायक असून अतिशय शोकांतिक आहे. लोक राज संगठन या निर्णयाचा निषेध करते आणि लढाऊ वृत्ती बाळगणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या संघर्षात साथ करते.