समान काम, समान वेतन, अनेक वर्षांपासून प्रलंबित अनुदानाचा प्रश्न आणि इतर काही न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर सोमवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी लाठीमार करण्यात आला. जवळपास 10 ते 15 शिक्षक यात गंभीर जखमी झाले आहेत. स्पार्क – वॉईस ऑफ यूथ ह्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करते.
आजच्या परिस्थितीत आपल्या राज्यात खाजगीकरणाचा भस्मासूर शिक्षण क्षेत्रात धुमाकूळ घालत आहे. आपल्या तुटपुंज्या पगारात मुलीमुलांचे शिक्षण पालकांना परवडणारे नाही. खाजगी शाळांच्या फी तर गगनाला भिडल्या आहेत. ज्या काही अनुदानित किंवा निमअनुदानित शाळा आहेत त्याच आज गोरगरीब जनतेला उपयुक्त आहेत. अशात ज्या शाळा अनुदानास पात्र आहेत त्यांना अनुदान मंजूर न करणे म्हणजे बहुसंख्य जनतेला शिक्षणापासून मुकवण्याचे काम एक प्रकारे सरकार करत आहे. अनेक वर्षांपासून शिक्षक अनुदानाची मागणी करत आहेत.
शिक्षक नवीन पीढी घडवत असतात. आपल्या देशातील बालकांना एक उत्तम नागरिक बनवण्याचे काम ते करतात. देशाला घडविण्याचे काम शिक्षक करतात. आज त्याच शिक्षकांना “फिक्स टर्म” कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाते. 5000 ते 8000 रुपये इतक्या कमी पगारात त्यांना राबवले जाते. अनेक ठिकाणी तर त्यांना तासिका तत्वांवर काम करावे लागते. मित्रमैत्रिणींनो आत्ता तुम्हीच विचार करा. ज्या शिक्षकांना स्वतःचे पोट भरायचे वांदे असतील, ज्यांचे स्वःतचे भविष्य अंधारात असेल, ते कसे काय विद्यार्थ्यांना स्वःतच्या पायावर उभे राहण्यासाठी तयार करतील, ते कसे काय देशाचे भविष्य घडवतील?
शाळांच्या अनुदानाचा प्रश्न काही नवा नाहीये. 2016 साली ज्या शाळा अनुदानास पात्र ठरल्या होत्या, त्यांना फक्त 20 टक्के अनुदान जाहीर करण्यात आले होते. आत्ता 2019 मध्ये इतर अनुदानास पात्र शाळांना 20 टक्के अनुदान तर ज्या शाळांना 20 टक्के अनुदान मिळतेय त्यांना वाढीव 20 टक्के म्हणजेच 40 टक्के अनुदान मंत्रीमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत घोषित केला गेला आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे ज्यांना पूर्ण भाकरीची भूक आहे त्यांना काही तुकडे फेकण्याचाच निर्णय आहे. सरकारने शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
आज वेगवेगळ्या शिक्षकांच्या वेतनातही बरीच तफावत आढळून येते. खूप कमी शिक्षक कायमस्वरुपी पदांवर काम करतात, ज्यांना सरकारी नियमांप्रमाणे पगार दिला जातो. परंतू बहुसंख्य शिक्षक आज कंत्राटी तत्वावर, तासिका तत्वावर काम करतात. कायमस्वरुपी आणि कंत्राटी तत्वांवर काम करणाऱ्यांचे पात्रता निकष, त्यांचे काम करण्याची वेळ आणि इतर बाबी जरी समान असल्या तरी त्यांच्या वेतनात खूप अंतर आहे. कायमस्वरुपी शिक्षकांचे वेतन आज तिप्पट किंवा काही ठिकाणी चौपटीहून जास्त आहे. समान कामासाठी समान वेतनाचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला धाब्यावर बसवून कारभार केला जातोय.
आज शिक्षकांना शिकवण्याबरोबर इतर गोष्टींचा भारही दिला जातो. समाजकल्याणासाठी सर्वेक्षण करणे, शासकीय योजनांच्या माहितीचा घरोघरी जाऊन प्रसार करणे अशी एक ना अनेक कामे शिक्षकांवर सोपविली जातात. निवडणुकांच्या वेळी तर प्रत्येक स्तरांवर शिक्षकांना कामाला जुंपण्यात येते. अशा इतर कामांसाठी वेगळा पगार त्यांना दिला जात नाही. काही वेळा तर मानधन म्हणून तुटपुंजी रक्कम प्रोत्साहन म्हणून त्यांना दिली जाते.
ही सर्व परिस्थिती पाहता, समान काम समान वेतन, सर्व पात्र शाळांना 100 टक्के अनुदान ह्या शिक्षक संघटनांच्या मागण्या खूप रास्त आहेत आणि त्या मान्य झाल्याच पाहिजेत. अशा मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या शिक्षकांवर लाठीमार करण्याचा तीव्र निषेध समाजातील सर्व स्तरांतून व्हायला हवा. बऱ्याचशा शिक्षक संघटनांनी व विद्यार्थी संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. स्पार्क सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना आणि सर्व संघटनांना आवाहन करते की शिक्षकांच्या ह्या लढ्यात सक्रियपणे सामील होऊन आपण हा लढा यशस्वी बनवूया!