डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) आणि अन्य 12 विद्यार्थी व युवा संघटनांनी 12 सप्टेंबर 2019 रोजी, पश्चिम बंगालमधील सिंगूर पासून नबान्ना या प्रशासकीय इमारतीपर्यंत दोन दिवसीय मोर्चाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण मोर्चावर पोलिसांद्वारे लाठीमार आणि अश्रुधुराचा हल्ला करण्यात आला.
वाढत्या बेरोजगारीवरील उपाय, सर्वांना उत्तम पगाराची नोकरी, विद्यापीठांत ढासळलेल्या लोकतांत्रिक वातावरणावर उपाययोजना, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले शिक्षण, अशा अनेक न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या शांततापूर्ण मोर्च्यात सहभागी झाले होते. हजारो स्वाक्षऱ्या असणारे निवेदन देण्यापूर्वीच पोलिसांनी मोर्चा अडवला. शांततापूर्ण मोर्च्यावर अश्रुधूर आणि पाण्यांच्या तोफांचा मारा करण्यात आला. पोलिसांद्वारे केल्या गेलेल्या लाठीमाराने आज पश्चिम बंगाल मधील रस्ते तरूण-तरुणींच्या रक्तांने लाल झाले आहेत. स्पार्क – वॉईस ऑफ यूथ ह्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करते.
आज आपण सर्व तरूण-तरुणींनी “एकावर हल्ला म्हणजेच सर्वांवर हल्ला” तत्वांचा अवलंब करून एकजूट व्हायला पाहिजे. ज्या मागण्या वरील मोर्चाद्वारे मांडल्या आहेत त्या फक्त पश्चिम बंगालपुरत्या मर्यादित नसून सर्वच विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या मागण्या आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मोर्च्यांवर जर असे भ्याड हल्ले होणार असतील तर आपण गप्प बसून चालणार नाही.
स्पार्क – वॉईस ऑफ यूथ सर्व युवक-युवतींना, सर्व विद्यार्थी संघटनांना आणि सर्व युवा संघटनांना आवाहन करते की ह्या भ्याड हल्ल्यांचा तीव्रतेने निषेध करावा.